राजकीय
“गुरू” पेक्षा “शिष्य” सरस ठरणार की , गुरू शिष्याला आसमंत दाखविणार? शिरुर च्या रंगतदार लढतीवर राज्याची नजर
राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडून दोन गट झाल्यानंतर, पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणुका होत असून यात अनेकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत यात बारामतीनंतर शिरुर लोकसभेची निवडणूक रंगतदार ठरत आहे.
शिरुर लोकसभा मतदार संघात महायुतीच्या माध्यमातून भाजपा सोबत शिवसेना (शिंदे गट) तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) असून शिरुर लोकसभेच्या जागेसाठी (अजित पवार गटाचे) उमेदवार शिवाजीराव आढळराव तर काँग्रेस सोबत शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांना सोबत घेत राष्ट्रवादी (शरद पवार गटाने) महाविकास आघाडीचे माध्यमातून उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यात अमोल कोल्हे व शिवाजीराव आढळराव यांच्यात सरळ थेट लढत होत आहे , परंतु वास्तविक पहाता ही लढत, अप्रत्यक्षपणे गुरू व शिष्याची आहे.असे म्हणणे वावगे ठरणार नाही . देशाचे कृषिमंत्री शरद पवार यांच्या तालमीत धडे घेणारे राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यातच ही लढाई असल्याचे बोलले जात आहे
राष्ट्रवादी काँग्रेस च्या विभाजना नंतर नामदार वळसे पाटील यांनी आपले पितृतुल्य खासदार शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार यांच्या बरोबर जाणे पसंत केले आहे.तरीसुद्धा त्यांच्या मनात शरद पवारांबद्दलचे प्रेम अद्यापही कमी झालेले नाही असे अनेकवेळा दिसून आले आहे.
राष्ट्रवादी पक्षाच्या विभाजना नंतर झालेल्या अनेकसभा मध्ये आपले मनोगत व्यक्त करताना आपल्या भाषणात शरद पवार यांचा विषय आल्यानंतर नामदार वळसे पाटील अनेकदा व्यथित झाल्याचे पहावयास मिळाले. वळसे पाटील यांच्या डोळ्यात व आवाजातील “भाऊकता” त्याच्या मनात शरद पवार यांच्या विषयी असलेला आदर व प्रेम स्पष्टपणे दाखवत होती. परंतु म्हणतात ना, युद्धात छातीवर दगड ठेवून नात्यागोत्याचा विचार न करता, मैदानात झुंजावे लागते. अगदी तशीच स्थिती वळसे पाटील यांची झालेली दिसत आहे.
शिरुर लोकसभेचे मतदान १३एप्रिल रोजी असून कार्यकर्ते कामास लागले आहेत. काही दिवसांपूर्वी नामदार वळसे पाटील यांना शारीरिक दुखापत झाल्याने ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. परंतु हॉस्पिटलमध्ये असूनही ते आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी जीवापाड प्रयत्न करताना दिसत आहेत. वळसे पाटलांना भेटण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला ते आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी आवाहन करीत आहेत. वळसे पाटील यांचे तालुक्यातील अनुपस्थितीत त्यांचे अतिशय जवळचे म्हटले जाणारे, प्रसिद्ध उद्योगपती देवेंद्र शाह हे कार्यकार्याना एकत्र करून प्रचाराची आखणी करीत आहेत व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत आहेत.
दरम्यान भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम यांनी शरद पवारांची साथ देत असून निकम यांनी आपले राजकीय गुरू वळसे पाटील यांना सोडचिठ्ठी देऊन दिली असून ते अमोल कोल्हे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत .
शिरुर लोकसभा मतदार संघाचे निवडणुकीत माजी खासदार शिवाजीराव आढळराव विरुद्ध डॉ अमोल कोल्हे असा जरी सामना होणार असला तरी खऱ्या अर्थाने हि लढत, गुरू (शरद पवार विरुद्ध वळसे पाटील) शिष्याचीच आहे असे म्हणावयास काही हरकत नाही. तसेच आंबेगाव तालुक्यातुन वळसे हे आढळरावांना हे लीड मिळवून देण्यात यशस्वी ठरतात की, देवदत्त निकम अमोल कोल्हे यांचा विजय सुखकर करतात. हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. या निवडणुकीत “गुरु पेक्षा शिष्य सरस ठरतो की, गुरू आपला शेवटचा न शिकवलेला डाव टाकून शिष्याला आसमंत दाखवितो. हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.