राजकीय
भोसरी ग्रामस्थांच्या एकजुटीचा संदेश हाच आपल्या विजयाची नांदी – रवी लांडगे
भोसरी दि (नेहे पाटील )-: गावचे गावपण टिकावे हाच आम्हा ग्रामस्थांचा प्रयत्न आहे. ज्याच्यासाठी पुढाकार घेत माघार घेतली. ग्रामस्थांच्या बैठकीमध्ये सर्वांच्या साक्षीने आपण एकत्र येऊन अजित गव्हाणे यांची पाठीशी उभे राहत आहोत हा संदेश आपल्या विजयाची नांदी ठरेल असा विश्वास शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते रवी लांडगे यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे भोसरी विधानसभेचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ भोसरीचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रवी लांडगे बोलत होते. यावेळी माजी आमदार विलास लांडे उमेदवार अजित गव्हाणे, बाळासाहेब गव्हाणे योगेश गवळी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना रवी लांडगे म्हणाले कि,भोसरी गावाला मोठा इतिहास आहे. येथील राजकारणाला समाजकारणाची जोड आहे. माझ्या कुटुंबाने भोसरी गावासाठी मोठे बलिदान दिलेले आहे.भोसरी ग्रामस्थांचे अनुकरण आजूबाजूची गावे करतात. गावातूनच जर बंडखोरीचे निशान फडकले गेले तर याचा संदेश वेगळा जाऊ शकतो. गावचे गावपण टिकावे हाच आम्हा ग्रामस्थांचा प्रयत्न आहे. ज्याच्यासाठी पुढाकार घेत माघार घेतली. ग्रामस्थांच्या बैठकीमध्ये सर्वांच्या साक्षीने आपण एकत्र येऊन अजित गव्हाणे यांची पाठीशी उभे राहत आहोत हा संदेश आपल्या विजयाची नांदी ठरेल असा विश्वास लांडगे यांनी व्यक्त केला
दरम्यान पुढे बोलताना रवी लांडगे म्हणाले कि, महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या धोरणात उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जो महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार असेल त्याचे काम करायचे हे आम्ही आधीच ठरवले होते. शहरातील एकही मतदारसंघ शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) न सुटल्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना अतिशय तीव्र होत्या. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर राखत मी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उमेदवारी अर्ज दाखल करणे हा शिवसैनिकांच्या वेदनांचा हुंकार होता. यापूर्वीही शिवसैनिकांना गृहीत धरून भोसरी विधानसभेमध्ये वागणूक मिळालेली आहे. मात्र यापुढे असे होणार नाही कारण मी शिवसैनिकाच्या पुढे खंबीरपणे उभा राहणार आहे.
शिवसेनेचे उपनेते सचिन अहिर, खासदार अमोल कोल्हे, भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात उभे असलेले अजित गव्हाणे तसेच भोसरीच्या ग्रामस्थांनी शब्द दिला आहे की येथून पुढे प्रत्येक गोष्टीत शिवसैनिकाला अग्रक्रम दिला जाई. त्यांना यथोचित मान सन्मान मिळेल. याची सर्व जबाबदारी पक्षश्रेष्ठींनी घेतलेली आहे. त्यामुळे सर्वांचा मान राखत माघार घेतली आहे. आणि अजित गव्हाणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
भोसरी गावाच्या संघर्षासाठी आपण एकत्र
अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अनेक गैरसमज निर्माण केले जातात. मात्र अपक्ष उमेदवारी म्हणजे हट्ट, एक प्रकारची जिद्द असते. माझा हा हट्ट केवळ शिवसैनिकांसाठी होता. यामागे माझी कोणतीही महत्त्वाकांक्षा नाही. शिवसेनेचा यथोचित मानसन्मान मतदारसंघात त्यांना मिळावा ही एकमेव मागणी कायम राहणार आहे.