सामाजिक
आपल्या मुलांच्या हक्काच्या नोकऱ्या गुजरातला पाळविणाऱ्यांना घरी बसवा – सुप्रिया सुळे
भोसरी दि. (प्रतिनिधी)आमचा संघर्ष वैयक्तिक नाही. महागाई, बेरोजगारी, अधिकार आणि भ्रष्टाचार या विरोधात आमची लढाई आहे. तळेगाव येथील फॉक्सकॉन प्रकल्प भाजपने ओढून गुजरातला नेला. या परिसरातील सहा लाख नोकऱ्या या भागातल्या मुलांना मिळणार होत्या. आमच्या मुलांच्या सहा लाख नोकऱ्या तुम्ही खाल्ल्या, तुम्हाला घालवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
.
महाविकास आघाडीचे भोसरी विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ मोशी येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी महिलांना मार्गदर्शन केले यावेळी शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी महापौर मोहिनी लांडे, माजी आमदार विलास लांडे, उमेदवार अजित गव्हाणे, शिवसेना पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, माजी नगरसेविका विनया तापकीर आदी उपस्थित होते.
मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, माजी नगरसेविका प्रियंका बारसे, संगीता ताम्हाणे, माई काटे, स्वाती साने, स्वाती चिटणीस, रूपाली आल्हाट, मंदा आल्हाट, शुभांगी बोऱ्हाडे यांनी मनोगत व्यक्त केले सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या कि ही निवडणूक वैयक्तिक संघर्षासाठी नाही, तर आपल्या अधिकारांसाठी आहे. वाढती महागाई ,बेरोजगारी यामुळे सर्वसामान्य जनता बेजार झाली आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपण सत्तेत आल्यानंतर सर्वप्रथम तेलाचे भाव आवाक्यात आणू असे आश्वासन दिले आहे
महाविकास आघाडीचे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे .रोजच्या जगण्यातले प्रश्न आम्हाला माहित आहे .त्यामुळे महिलांनी निर्धास्त होऊन महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे महागाईच्या मुद्द्यानंतर या राज्यातील वाढती बेरोजगारी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. गेल्या दहा वर्षात या प्रश्नाची गुंतागुंत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आपल्या राज्यातील प्रकल्प दुसऱ्या राज्यात पळवले जात आहे.
दुसऱ्या राज्यात प्रकल्प नेण्याबद्दल दुमत नाही. मात्र आमच्या मुलांच्या ताटातला घास हिसकावून नेण्याची भाजपची वृत्ती निंदनीय आहे. तळेगावात आलेला फॉक्सकॉन प्रकल्प यांनी गुजरातला पळवला आमच्या मुलांच्या ताटातला घास काढून नेण्याचे पाप या भाजपने केलेले आहे. आज हा प्रकल्प सुरू झाला असता तर आमच्या भागातील तरुणांना सहा लाखांहून अधिक नोकऱ्या मिळाल्या असत्या. आमच्या मुलांच्या नोकऱ्या खाणाऱ्या या भाजपच्या उमेदवारांना त्यामुळे घरी बसवायचे आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महिलांना त्यांचे अधिकार देऊन सन्मान, स्वाभिमान जपण्याचे काम केले जाणार आहे असेही सुळेयांनी सांगितले
दोन हजार कोटींचा खर्च करून ठाकरेना मुख्यमंत्री पदावरून हटविले
महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी, माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद काढून घेण्यासाठी चाळीस आमदारांची 50 खोके देऊन खरेदी केली गेली. दोन हजार कोटी खर्च करून आमदारांना विकत घेतले असा गंभीर आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. दोन हजार कोटींचा खर्च करून उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री पद काढून घेण्याचे पाप भाजपने केले. उद्धव ठाकरे यांना पदावरून खाली खेचणाऱ्यांना घरी बसवा असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले.