सामाजिक
मंचर येथील महात्मा गांधी विद्यालयात “बाल दिन” उत्साहात साजरा….!!!
मंचर दि.(प्रतिनिधी) भारताचे पंतप्रधान भारतरत्न पंडित जवाहर लाल नेहरू यांच्या जयंती निमित्ताने मंचर येथील महात्मा गांधी विद्यालयात बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
रयत शिक्षण संस्थेचे, महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मंचर येथे आज (दि14रोजी) भारताचे पहिले पंतप्रधान भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बाल दिन म्हणून साजरा करण्यात आला. विद्यालयाचे प्राचार्य उत्तम आवारी यांच्या हस्ते पंडित नेहरूंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर उप मुख्याध्यापिका सुरेखा भांगरे, पर्यवेक्षक यादव चासकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रज्वल शिंदे,वेदिका चव्हाण, नितीन उगले,समृद्धी दहिदुले या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. पंडित नेहरूंना लहान मुलं खूप आवडायची व मुलेही त्यांना चाचा म्हणायचे. खऱ्या अर्थाने हे मुलेच देशाचे भवितव्य असून संस्कारक्षम पिढीचा देशाच्या भवितव्यात खूप मोठा वाटा असतो असे त्यांचे मत होते.
देशहिताच्या अनेक योजना त्यांच्या कार्यकाळात राबवल्या गेल्या.सामाजिक राजकीय,कार्याबरोबरच शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी दिलेले योगदान खूप मोठे आहे असे मत विद्यालयाचे प्राचार्य उत्तम आवारी यांनी व्यक्त केले.पंडित नेहरू यांनी लिहिलेला डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ विद्यार्थ्यांनी जरूर वाचावा असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला. नेहरूंचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात खूप मोठे योगदान होते. गांधीजींच्या विचारांचा त्यांच्या जीवनावर पगडा होता व तसेच अनेक वर्ष पारतंत्र्यात काढलेल्या या देशातील जनतेचा जीवन स्तर कसा सुधारला जाईल यासाठी त्यांनी जीवनभर प्रयत्न केले. विद्यार्थ्यांनी नेहरूंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रगती साधावी असेही आवारी यांनी सांगितले.
दरम्यान कार्यक्रमाचे सूत्र संचलन सोहम केंगले तर आभार प्रगती हुले या विद्यार्थिनीने मानले.कार्यक्रमाचे नियोजन मनीषा थोरवे,कल्याणी बांगर,सोनाली शिंदे, गोरक्ष केदारी, नंदा केंगले,संतोष मुंढे, किसन थोरात यांनी केले.