सामाजिक
आदिशक्ती मळगंगेच्या “भाळीचा ईश्वर”, चिंचोली(कोकणे) येथील शिव मंदिर “कपालेश्वर”
मंचर दि. (संजय कोकणे पाटील ) “आदिशक्तीच्या भाळीचा ईश्वर म्हणजेच आंबेगाव तालुक्यातील चिंचोली(कोकण्यांची) येथील कपालेश्वर महादेव होय……महाराष्ट्रातील साडेतीन पिठांपैकी एक असलेल्या माहूर गडाची रेणुका मातेचं पीठ असून, आदिशक्ती रेणुका माता विश्वजणनी आहे.कार्ला लेणी येथील एकविरा माता , कर्नाटकातील यल्लमा, व निघोजची मळगंगा हि आदिशक्ती रेणुका मातेची रूपे असल्याचे सांगितले जाते.
जुन्या पिढीच्या व्यक्तींकडून अशी आख्यायिका सांगितली जाते कि, “आदिशक्ती मळगंगा मातेचे” वास्तव्य चिंचोली येथील ढुम्या डोंगराजवळ होते .या काळात “धूम” नामक दैत्याने भगवान शंकरांना प्रसन्न करून वर प्राप्त केला होता. त्यानंतर निर्माण झालेल्या अहंकारापोटी “धूम” दैत्याने मानवासहित देवांना ही, घाबरून सळो कि पळो करून सोडले होते. या “धूम” राक्षसाचा वध करून पुन्हा धर्माची स्थापना व्हावी. यासाठी देवतांनी भगवान शंकरांचे आवाहन केले. परंतु “धूम” दैत्याचा वध “आदिशक्तीच्या” हातुनच होणार असल्याने, भगवान शंकरासोबत सर्व देवातांनी आदिशक्तीचा धावा केला.व आदिशक्तीने प्रसन्न होऊन मळगंगा मातेचा अवतार घेऊन या “धूम” दैत्याचा वध केला. व त्या दैत्याच्या अत्याचारातून सर्वांची सुटका केली.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात घोड नदीच्या पवित्र तिरावर चिंचोली (कोकण्यांची) येथे “कपालेश्वर महादेव” या नावाने पवित्र प्राचीन शिव मंदिर आहे. या मंदिरास कपालेश्वर महादेव मंदिर म्हणून ओळख आहे. खरंतर सनातन धर्मा प्रमाणे स्त्री च्या कपाळावरचा मळवट म्हणजेच कुंकू व कपाळावरील कुंकवास “पतीचेदेवाचे ” प्रतीक म्हणून ओळखले जाते. हिंदू धर्मात पतीला परमेश्वराचे स्थान समजले जाते . व कपाळावरील मळवट(कुंकू) हे स्त्रीच्या पती परमेश्वराचे वास्तव्य दाखववितो म्हणजेच आदिशक्ती मळगंगेच्या कपाळावरील मळवट रूपाने म्हणजेच कुंकू रूपाने असलेला ईश्वर तोच कपालेश्वर महादेव होय…..
आदिशक्ती मळगंगा मातेचा निवास नगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यात मानला जातो. परंतु आदी शक्तीची मळगंगा मातेचे एक स्थान आंबेगाव तालुक्यातील चिंचोली कोकणे याठिकाणी आहे. चिंचोली कोकण्यांची या सुमारे दीड हजार वस्तीच्या छोट्याशा गावांत श्री कपालेश्वर महादेवांचे एक अनोखं भव्य मंदिर शेकडो वर्षांपासून उभे असून हे मंदिर या गावचे ग्रामदैवत आहे. या कपालेश्वर मंदिरात प्राचीन काळापासुन अतिशय सुंदर आणि आकर्षक शिवलिंग आहे. या मंदिर व मंदिराचा गाभारा याचे अतिशय सुरेख दगडी बांधकाम जुन्या काळात करण्यात आलेले आहे.तसेच नदीकाठचा परिसर निसर्गाच्या अनोख्या अविष्काराची साक्ष देतो त्यामुळे येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकाच्या मनात सकारात्मकता व प्रसन्नता निर्माण होते. तसेच भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणारे जागृत देवस्थान म्हणून या मंदिराची ओळख आहे.
कपालेश्वर महादेव यात्रा दरवर्षी माघ शुद्ध दशमी या पवित्र शुभ मुहूर्तावर यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न होत असते. दरवर्षी यात्रा उत्सवाच्या निमित्त गावामध्ये हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते पंचक्रोशीतील भक्त भाविकांसाठी ही एक पर्वणीच असते.त्यासोबत कुस्त्यांचा जंगी आखाडा, हारतुरे यांची भव्य मिरवणूक काढली जाते. गावातील पुरुषाबरोबरच सर्व महिला पाण्याच्या घागरी घेऊन मिरवणुकीमध्ये सहभागी होतात. लेझीम, ढोल, वाजंत्री या पारंपारिक वाद्यांच्या मंगल गजरामध्ये अतिशय भव्य व नेत्रदीपक मिरवणूक सर्वांचे आकर्षन ठरते करते. नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई, पुणे आदी शहरांमध्ये वास्तव्यास असलेले सर्व चिंचोलीकर भक्ती भावाने सहकुटुंब श्री कपालेश्वर महादेवांचा अभिषेक करण्यासाठी व आशीर्वाद घेण्यासाठी प्रतीवर्षी गावी येतात. यात्रेच्या निमित्ताने संपूर्ण दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
त्याचप्रमाणे दरवर्षी येणाऱ्या श्रावण मासात भगवान शिवशंकराचे रूप असलेले कपालेश्वर महाराजांचे मंदिरात शिवलिंगावर दुग्धभिषेक करून रुद्र पूजा केली जाते. तसेच श्रावणी सोमवार निमित्त फुलांची आकर्षक व दिव्यांची सजावट करून साजविले जाते. ग्रामदैवत श्री कपालेश्वर महाराज यात्रा उत्सवाबरोबरच गावात आदिशक्ती मळगंगा मातामंदिर , हनुमान मंदिर, मुक्ता देवी मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मातेचे मंदिर असून या सर्व देवतांचे उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात सध्याच्या काळाच्या ओघात गावचं रूप बदलत असूनहि गावातील जुन्या वा नवीन फळीतील मंडळींनी आपला धार्मिक, समाजिक व सांस्कृतिक वसा जपून ठेवला आहे.