सामाजिक
माघ पौर्णिमेनिमित्ताने “कुलस्वामीं श्री म्हाळसाकांत खंडोबाच्या” मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी
मंचर दि. (सदानंद शेवाळे ) -सदानंदाचा यळकोट…. भैरवनाथचा चांगभलं……. आंबाबाईचा उदोउदो……. च्या घोषणा देत तळीभंडारा उधाळत हजारो भाविकांनी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुलस्वामी खंडोबा देवस्थान यांच्या माघ पौर्णिमेनिमित्त दर्शन घेतले
माघ पौर्णिमेनिमित्ताने विविध ठिकाणी असलेल्या श्री खंडोबा मंदिरामध्ये ‘सदानंदाचाऽ येळकोट’च्या जयघोषात भंडार-खोबऱ्याची मुक्त उधळण करत हजारो भाविकांनी मोठ्या उत्साहात दर्शन घेतले आंबेगाव तालुक्यातील शिंदेवाडी,धामणी, खेड तालुक्यात निमगाव, खरपूडी तसेच जुन्नर तालुक्यात वडज येथील धार्मिक क्षेत्ती जाऊन त्याचप्रमाणे श्री क्षेत्र जेजुरी गडावर लाखो भाविकांनी कुलस्वामी श्री म्हाळसाकांत खंडोबांचे दर्शन घेतले.
दरम्यान विविध खंडोबांच्या मंदिर परिसरात अनेक व्यापाऱ्यांनी भंडार, खोबरे व पेढे विक्रीची दुकाने लावली होती. सकाळी धामणी, लोणी, शिरदाळे, पहाडदरा, ज्ञानेश्वरवस्ती, अवसरी खुर्द (राजगुरू मंडळी), गावडेवाडी, महाळुंगे (पडवळ), लांडेवाडी, जारकरवाडी या गावांतील भाविकांनी पारंपारिक वाद्यांच्या सुरात तसेच ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीने देवास हारतुरे, मांडवडहाळे व नैवेद्य अर्पण केले.
यावेळी नवसांच्या बगाडांची मिरवणुका काढण्यात आली. मंदिराच्या आवारात भाविकांनी खंडोबाची जागरणे केली. तसेच तळी भरली. यात्रा उत्सव कमिटीने दुकाने तसेच हॉटेल व्यावसायिकांसाठी जागा ठरवून दिल्या व दोन दुकानांच्या रांगामध्ये पुरेशे अंतर ठेवल्याने गर्दीची कोंडी टाळता आल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले. यात्रेची व्यवस्था यात्रा उत्सव समिती, ग्रामस्थ, ग्रामपंचायत आणि गावातील तरुण मंडाळाच्या कार्यकर्त्यांनी पाहिली. मंदिर व परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती.