सामाजिक
“आपल्या दैनंदिन जीवनात आपण, मराठी भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे” – प्रा. डॉ. पुरुषोत्तम काळे
घोडेगाव दि(प्रतिनिधी) -आपल्या दैनंदिन व्यवहारात आपण जाणीवपूर्वक मराठी भाषेचा अंगीकार करून, मराठी भाषेचा अभिमान आपण बाळगला पाहिजे असे मत प्रा. डॉ. पुरुषोत्तम काळे यांनी व्यक्त केले.
मराठी “राजभाषा” दिवस तथा मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून, आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचलित न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल घोडेगाव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यावेळी डॉ काळे बोलत होते. आज प्रत्येक पालक आपल्या पाल्याला इंग्रजी भाषेचे ज्ञान मिळावे यासाठी प्रयत्न शील आहे.बदलत्या काळानुसार आपणाला इतर भाषांचे ज्ञान असणे गरजेचे आहे परंतु त्यासोबत मराठी भाषेचे ज्ञान असणे ही अत्यावश्यक आहे.त्यामुळे इतर भाषा शिकताना आपल्या मराठी भाषेचा आपण अभिमान बाळगायला हवा.
या वेळी आयोजित कार्यक्रमात विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नृत्य,नाट्य,गायण ,विनोद, मराठी शब्द कोडी, अशा विविध मनोरंजक कार्यक्रम सादर केले.तसेच आपल्या वक्तृत्वाची छाप आपल्या भाषणातून उमटवत श्रेष्ठ साहित्यिक “कुसुमाग्रज” यांच्या जीवनकार्याची तसेच त्यांनी निर्मिलेल्या साहित्याची माहिती व मराठी भाषेची थोरवी सर्वांना सांगितली.
दरम्यान या कार्यक्रमाच्या प्रसंगी बी. डी. काळे महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. श्री.पुरुषोत्तम काळे सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले.तसेच संस्थेने अध्यक्ष श्री तुकाराम काळे, कार्याध्यक्ष श्री सुरेश शेठ काळे,समन्वय समितीचे चेअरमन श्री राजेश काळे, संस्थेचे कोषाध्यक्ष श्री सोमनाथ काळे, विद्यालयाचे चेअरमन श्री बाळासाहेब काळे, संस्थेचे संचालक श्री. अजित काळे, तसेच मायबोली ग्रंथालयाच्या व्यवस्थापिका तथा सेवानिवृत्त आदर्श शिक्षिका श्रीमती हिराबाई काळे,प्राचार्या श्रीमती मेरी फ्लोरा डिसोजा, उपप्राचार्या श्रीमती रेखा आवारी, पर्यवेक्षिका सौ वंदना वायकर इ.उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन मराठी विषय समिती शिक्षक सौ. वंदना वायकर,सौ. प्रज्ञा घोडेकर, श्रीमती सुषमा थोरात,सौ. सुषमा फलके यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कू. ऋतिका घोडेकर व कु. रुची लोहोट यांनी तर आभार प्रदर्शन कु. पूर्वी शिंदे या विद्यार्थिनींनी केले.