सामाजिक
“हिरडा खरेदी” आणि “भीमाशंकर” रस्त्याच्या दुरवस्थेवरून, संतप्त आदिवासी जनतेकडून तळेघर येथे रास्ता रोको
मंचर दि.(प्रतिनिधी): श्री क्षेत्र भीमाशंकर रस्त्याची दुरावस्था व त्याचप्रमाणे हिरड्याची बंद असलेली खरेदी यांसह विविध मागण्यासाठी तळेघर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट), बिरसा ब्रिगेड, अखिल भारतीय किसान सभा आणि ट्रायबल फोरम यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आदिवासी बांधवांचे उपजीविकेचे प्रमुख साधन असलेल्या हिरड्याची बंद असलेली खरेदी योग्य किंमतीने तातडीने सुरू करावी त्याचप्रमाणे श्री क्षेत्र भीमाशंकर रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली. सध्या श्रावण मास सुरु असलेल्याने देशाच्या कानकोपऱ्यातून लाखो शिवभक्त शिवज्योर्तिलिंगाचे दर्शनासाठी येत आहेत. परंतू भीमाशंकरकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्याप्रमानावर दुरावस्था झाली असून, या रस्त्याची दुरुस्ती करावी, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.आंदोलनात मोठ्याप्रमानावर आदिवासी बांधव सहभागी झाले होते
दरम्यान आदिवासी विकास विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घोडेगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम,तालुकाध्यक्ष धोंडीभाऊ भोर, महिला अध्यक्ष पूजा वळसे, युवक अध्यक्ष विशाल वाबळे, किसान सभेचे सचिव अशोक पेकारी, बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष संतोष तिटकारे, ट्रायबल फोरमचे अध्यक्ष सखाराम हिले, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब बाणखेले, सदानंद शेवाळे (पाटील),शेतकरी नेते माउली ढोमे, पुरुषोत्तम फदाले, शिवराम केंगले, दीपक चिमटे,के. के. तिटकारे, गणेश खाणदेशी, कृष्णा वडेकर, लखन पारधी उपस्थित होते.
“हिरडा खरेदीसाठी हमीभाव मिळावा”
माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हिरडा खरेदीसाठी हमीभाव मिळावा आणि खरेदी लवकरसुरू व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वारंवार बैठका घेतल्या. तसेच मंचर-भीमाशंकर रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विकास विभागाला आदेश दिल्यापासून तात्पुरते खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले आहे, अशी माहिती माजी पंचायत समिती सभापती आणि आदिवासी नेते संजय गवारी यांनी दिली.